'ई-केवायसी' केली; सात हजार शेतकऱ्यांना लाभ बाकी!
जिल्ह्यातील १.८७ लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ
अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) अंतर्गत जिल्ह्यात १ लाख ९५ हजार १४७ लाभार्थी शेतकऱ्यांनी 'ई-केवायसी' प्रक्रिया पूर्ण केली असली तरी त्यापैकी १ लाख ८७ हजार ६२५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २३ व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर 'ई-केवायसी' प्रक्रिया पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील उर्वरित ७ हजार ५२२ लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणे अद्याप बाकी आहे.
केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. त्यामध्ये तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपयांची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते.
योजनेचा लाभ पुढे सुरू ठेवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी दरवर्षी 'ई-केवायसी' प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण १ लाख ९८ हजार ९५४ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ८ जूनपर्यंत १ लाख ९५ हजार १४७ लाभार्थी शेतकऱ्यांनी 'ई-केवायसी' प्रक्रिया पूर्ण केली आहे.
ई-केवायसी केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या
| तालुका | लाभार्थी |
|---|---|
| अकोला | ३३,१४० |
| अकोट | ३२,९१२ |
| बाळापूर | २८,७१० |
| बार्शिटाकळी | २४,५३८ |
| मूर्तिजापूर | २४,९०० |
| पातूर | २०,६२० |
| तेल्हारा | २४,७८१ |